खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वागतशील प्रवेशद्वार…मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुखनदीकाठी वसलेले मध्यवर्ती पेठेचे निसर्गरम्य गाव. राष्ट्रकुल काळ, शिवकाळ व अव्वल इंग्रजी काळ यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले तसेच स्वातंत्र्योत्तर विकासपर्वात एक शिक्षण केंद्र म्हणून नावारूपाला आलेले ठिकाण. या परिसरातील १०० गावांशी खारेपाटणचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी व व्यापारउदीम विषयक प्रभावी संपर्क आहे. सुमारे ५५०० लोकसंख्येच्या या गावात हिंदू, मुस्लिम, जैन व बौद्ध अशा विविध संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत आहेत.

       स्वातंत्र्यसैनिक वीर गुरुवर्य श्री. शंकरराव पेंढारकर यांनी आपले शैक्षणिक कार्य खारेपाटणला सुरू केल्यानंतर १९५८ मध्ये राष्ट्रसंत विनोबा भावे भूदान यात्रेच्या निमिचाने खारेपाटणला आले होते. त्यावेळच्या ग्रामसभेत त्यांनी असे उद्गार काढले की, “खारेपाटण हे गांव विकास न होऊ शकण्याइतके लहान नाही, व प्रगतीला बाधक ठरेल इतकं मोठंही नाही. येथे ग्रामीण विकासाचा विचार व आचार करणारे कार्यकर्ते आहे. म्हणून हे गांव भारतातील एक आदर्श गांव होऊ शकेल.” आता खारेपाटण येथील ग्राम सचिवालय, वीज केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालय, हौसिंग सोसायटी, दूरध्वनी केंद्र, सहकारी सोसायटी, पतसंस्था व विशेषत: येथील शिक्षण संकुल या गावाच्या आधुनिक खुणा पाहिल्या की विनोबाजींच्या आशीर्वादाची आठवण होते. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर शिक्षण संकुल म्हणजेच

  • शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय ( माध्यमिक विभाग)
  • शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय ( प्राथमिक विभाग)
  • उद्योगश्री प्रभाकर लक्षण पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स,कॉमर्स ॲंड आर्ट्स
  • तात्यासाहेब मुसळे तांत्रिक विद्याभवन उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
  • कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

        स्वातंत्र्योत्तर विकास प्रारंभी दि. १६ मार्च १९५३ रोजी गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर खारेपाटण येथे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेची ज्येष्ठ शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी स्थापना केली. या संस्थेची धुरा जून १९५४ पासून स्वातंत्र्यसैनिक वीर गुरुवर्य श्री. शंकरराव पेंढारकर व सौ. वत्सलाबाई पेंढारकर या ध्येयवाद दाम्पत्याने निःस्वार्थ व झुंजार वृतीने स्वीकारली. सन १९६३ मध्ये विद्यालयाच्या वास्तूचा उद्घाटन समारंभ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार व शेठ जोगेंद्रभाई मफतलाल यांच्या उपस्थितीत झाला. १९७५ पासून ज्युनिअर कॉलेज विभाग सुरु झाला. १९७८ मध्ये संस्थेचा रौप्यमहोत्सव मुंबई व खारेपाटण येथे करण्यात आला. मुंबई येथील समारंभ तत्कालिन मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. भणगे यांच्या अध्यक्षतेखाली व शेठ अरविंदभाई मफतलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. रौप्य महोत्सवानंतर ज्युनिअर कॉलेजची स्वतंत्र दुमजली इमारत बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यावेळी देणगीदार नडगिवे गावचे सुपुत्र व मुंबईचे दानशूर उद्योगपती श्री. प्रभाकर लक्ष्मण पाटील यांचे नाव ज्युनिअर कॉलेजला २९ एप्रिल १९९९ रोजी समारंभपूर्वक देण्यात आले. जून २००३ मध्ये संस्थेचा सुवर्णमहोत्सव खारेपाटण येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

      खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी १९५३ मध्ये कै. डॉ. डी. एल. सोमण यांनी स्वीकारली. त्यानंतर १९६१ ते १९६८ असे दीर्घकाळ कै. डॉ. एस. आर. गुणिजन व १९७८ ते १९९५ पर्यंत डॉ. वसंतराव राणे यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यानंतर संस्थेचे माजी विद्यार्थी श्री. पुरुषोत्तम धों. ऊर्फ बबनशेठ धुमाळे यांनी १९९५ ते १९९८, १९९९ ते २००३ व २०१६ ते २०१८ कार्यकालासाठी अध्यक्षपद सांभाळले.  २००४ ते २००७ श्री. सू. शं. उर्फ कांताप्पा शेट्ये अध्यक्षपदी कार्यरत होते. २०१४ ते २०१६ कालावधीत श्री.संजय देसाई हे अध्यक्ष म्हणून काम पहात होते. सध्या २०१८ पासून श्री. प्रविण लोकरे हे अध्यक्षपदाची धुरा सांभाळीत आहेत.

     खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मालकीची ५ हेक्टर जमीन असून या क्षेत्रामध्ये माध्येमिक शाळा इमारत, कनिष्ठ महाविद्यालयीन इमारत, सेमि इंग्लिश मिडीयम स्कूल इमारत, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इमारत, शालेय कॅंटीन व मुला-मुलींसाठी व शिक्षकांसाठी स्वतंत्र स्वच्छताग्रूह या सोबतच हापूस आंबा कलमे, काजू, नारळी असा परिसर आहे. जुन्या इमारतीचे क्षेत्रफळ १२ हजार ८९६.५ चौ. फू. असून नवीन इमारतीच्या तळमजला, पहिला व दुसरा मजला असे सुमारे २१ हजार ३०० चौ. फू. क्षेत्रफळ बांधकाम आहे.

विद्यालयीन नेतृत्व

           संस्थेने सुरू केलेल्या हायस्कूलच्या प्रथम मुख्याध्यापिका म्हणून १९५४ ते १९५६ अशी दोन वर्षे कै. सौ. वत्सलाताई पेंढारकर यांनी काम केले. १९५६ ते १९८२ या काळात गुरुवर्य शंकरराव पेंढारकरांचे नेतृत्व लाभले. त्यानंतर श्री. शरद काळे (१९८२ ते १९८७), कै. मोहन. ज्ञा. चोपडे (१९८७ ते १९९५), कै. श्री. म. शं. शंकरदास (१९९५ ते १९९६), कै. श्री. विलास श्रीपती चिले (१९९६ ते १९९९), कै. श्री. विश्वनाथ ल. थुमके (१९९९ ते २००६), श्री. पुंडलिक रा. भुजबळे (२००६ ते २०१०), श्री. मन्सूर जमाल नदाफ (२०१० ते २०१३), श्री. सुहास केशव रानडे (२०१३ ते २०१६), सौ. योगिनी सुहास रानडे (२०१६ ते २०१८) व श्री. विलास फराक्टे (२०१८ ते २०२०) यांनी मुख्याध्यापक म्हणून समर्थपणे काम पाहिले. सध्या जून २०२० पासून श्री. प्रकाश आण्णासाहेब अकिवाटे मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळीत असून श्री. संजय जगन्नाथ सानप पर्यवेक्षक म्हणून काम पाहत आहेत.