देणगी आवाहन
सस्नेह नमस्कार !
स्वातंत्र्य सैनिक, गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांनी स्थापन केलेल्या या शैक्षणिक संकुलातून शिक्षण घेऊन आज असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी यशाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान आहेत. आपणा सर्वांचा आम्हास सार्थ अभिमान आहे. स्थापनेपासून ते आजपर्यंत संस्थेचा गुणवत्तेच्या दृष्टीने आलेख हा चढता राहिलेला आहे अनेक आव्हानांचा सामना करीत आजच्या या माहितीच्या युगामध्येही आपली संस्था ग्रामीण भागातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. मात्र आजमितीस गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक शिक्षण देताना अनेक अडचणी समोर आहेत. अनेक पायाभूत सुविधा निर्माण करताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. शासनाकडून वेतनेतर अनुदान केव्हाच बंद झालेले आहे. आज बदलत्या काळाची गरज म्हणून सर्वच क्लासरूम व्हर्च्युअल करण्याची गरज आहे. ही मोठी ‘खर्चिक’ बाब आहे. शिवाय अनेक वर्ग-खोल्यांची दुरुस्ती हा एक ज्वलंत प्रश्न आहे. संस्थेच्या लौकिकाच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांच्या शास्वत विकासाच्या दृष्टीने; आता अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे: प्रश्न आहे तो आर्थिक घडामोडींचा त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न संस्था करतेच आहे.
गुरुवर्य वीर पेंढारकर सरांनी गुंफलेली ही अतुट नात्यांची माळ आज अधिक घट्ट करण्याची गरज आहे. या दशक्रोशीतील समाजाच्या सर्वांगीण विकासात आजवर अग्रेसर राहिलेल्या या शैक्षणिक रथाची चक्रे अधिक गतीमान करण्याची गरज आहे. तरच ह्या स्पर्धेच्या युगात आपण तग धरू. आज अनेक व्यक्ती ज्या या संकुलात ज्ञानार्जन करून देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. ही दैदिप्यमान परंपरा कायम ठेवण्यासाठी समाजातील सर्वच थरांतून मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. आपल्यासारख्या सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुवर्णसंधी आहे ! या शैक्षणिक संकुलाच्या आधुनिक उन्नतीसाठी भरगोस आर्थिक मदत देऊन विकासाचे साक्षीदार होण्याची.
तेव्हा संकल्प करूया माझी शाळा- माझी अस्मिता’ ही गोष्ट सार्थ करण्याचा. परत एकदा मागे फिरून ‘माझी शाळा’ पाहण्याचा व तिच्या विकासात योगदान देण्याचा. आम्हांस खात्री आहे गुरुवर्य पेंढारकर सरांनी सुरु केलेला हा ज्ञान यज्ञ, आपणा सर्वांच्या बहुमूल्य योगदानामुळे अधिक ऊर्जेने सतत तेवत राहील ही ज्ञानपताका गगणाला भिडत सतत फडफडत राहील.